हॉस्पीटलमधून 4 दिवसानंतर व्हाईट हाऊसला परतले डोनाल्ड ट्रम्प, म्हणाले – ‘कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही’

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संक्रमित अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आर्मी हॉस्पीटलमध्ये चार दिवस उपचार घेतल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा व्हाईट हाऊसला परतले. यादरम्यान, 77 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प निरोगी दिसले. आपला फिटनेस दाखवत निवासस्थानात जाताना डोनाल्ड ट्रम्प लिफ्टऐवजी जिन्याने जाताना दिसले आणि त्यांनी पत्रकारांना अभिवादन देखील केले. असे म्हटले जात आहे की, ट्रम्प पूर्णपणे कोरोनातून बरे झालेले नाहीत, परंतु त्यांच्या प्रकृतीत खुप सुधारणा झाली आहे, ज्यामुळे त्यांना हॉस्पीटलमधून सोडण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर वॉल्टर रीड नॅशनल मेडिकल सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांच्या टीमने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प घरी जाण्यासाठी पूर्णपणे फिट आहेत. गुरुवारी रात्री कोरोना व्हायरसने संक्रमित आढळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी सैन्य हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची पत्नी मेलानिया सुद्धा कोरोना व्हायरसने संक्रमित आढळली होती.

वॉल्टर रीड नॅशनल मेडिकल सेंटरमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रथम डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, लवकरच निवडणूक कॅम्पेनमध्ये जाईन, फेक न्यूज केवळ फेक पोल दाखवत आहेत. यापूर्वी लष्कराच्या हॉस्पीटलमध्ये भरती झालेले कोरोनाग्रस्त अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प समर्थकांना अभिवादन करण्यासाठी गाडीत बसून निघाले आणि त्यांनी सर्वांना आश्चर्य चकित केले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, मी आज सायंकाळी 6.30 वाजता ग्रेट वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधून निघेन. मला बरे वाटत आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही आमच्या शासनकाळात काही चांगली औषधे आणि माहिती विकसित केली आहे. मला 20 वर्षापूर्वी जसे वाटत होते, त्यापेक्षा जास्त चांगले वाटत आहे.

डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे नेते आहेत आणि दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पार्टीचे नेते जो बायडेन आहेत. जे देशाचे उप राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. ट्रम्प पहिल्या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये सहभागी झाले होते आणि पुढील डिबेट 15 ऑक्टोबरला होईल.