Coronavirus : निवडणुकांच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं भाषण, ‘कोरोना’च्या वॅक्सीनबाबत केली मोठी घोषणा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिक भाषण केले. त्यामध्ये त्यांनी औषध कंपनी फायजरच्या कोरोना लशीबद्दल नवीन माहिती देत एप्रिलमध्ये सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोनाची मोफत लस देणार असल्याची घोषणा केली.

डेमोक्रॅटिक पार्टीचे जाे बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल १२८ वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. मात्र, ट्रम्प अद्याप आपला पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. भाषणादरम्यान, त्यांनी काही आठवड्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि कोरोनाचा जास्त धोका असलेल्या नागरिकांना लस दिली जाईल असे सांगितले.आमच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला फायजरची लस मोफत देण्यात येणार आहे, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

लस डिसेंबरमध्ये उपलब्ध होण्याचा दावा
कोरोनापुढे अमेरिकाही हतबल झाली आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार यांनी कोरोना लशीसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. अमेरिकेत डिसेंबर महिन्यात कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. फायजरने विकसित केलेल्या लशीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आणि सुरक्षित असल्याची माहिती आहे. त्यामुळे फायजर कंपनी आपल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष आरोग्य प्राधिकरणाला लवकरात लवकर सोपवू शकतात, असे एलेक्स अजार यांनी सांगितले.

१.९५ अब्ज डॉलरचा करार
अमेरिकन सरकार आणि फायजर यांच्यात कोरोना लशीसंदर्भात १.९५ अब्ज डॉलरचा करार झाला असून, ५० मिलियन नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार आहे. सरकारला दर महिन्याला फायजरने विकसित केलेल्या लशीचे जवळपास दोन कोटी डोस उपलब्ध होतील. लशीबाबतचा अंतिम निर्णय हा चाचणीचा रिझल्ट कसा आहे यावर असणार आहे. तसेच सर्वांत पहिला डोस हा नर्सिंग होममधील वृद्धांना देण्यात येणार आहे, असंही अजार यांनी म्हटलं आहे.