ट्रम्प यांच्या भाषणात बॉलिवूडचा ‘उल्लेख’, आठवण आली ‘बिग बी’च्या शोले अन् किंग खानच्या DDLJ ची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी अहमदाबादेत आल्यानंतर मोटेरा स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींसह देशवासियांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉलिवूड सिनेमांचे तोंडभरुन कौतूक केले. त्यांनी शाहरुख खान आणि काजोलच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमाचा देखील उल्लेख केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतीय सिनेमासृष्टी मोठी आहे. येथे दरवर्षी दोन हजार पेक्षा जास्त सिनेमे बनतात. येथील सिनेमात भांगडा आणि संगीत खूपच सुंदर असते. त्यांनी यावेळी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि शोले सिनेमाचे कौतूक केले. ट्रम्प म्हणाले की भारताने जगाला सचिन आणि विराट कोहलीसारखे खेळाडू दिले.

ट्रम्प यांनी यावेळी आयुष्मान खुराना याच्या शुभ मंगल ज्यादा सावाधान चे कौतूक केले. ब्रिटिश एक्टिव्सिट पीटर गैरी टॅचेल यांनी शुभ मंगल ज्यादा सावधान संबंधित ट्विट देखील केले आहे. त्यांनी लिहिले की बॉलिवूडची एक रोमाँटिक फिल्म रिलीज झाली आहे. भारतात समलैंगिकतेला वैध केल्यानंतर देशभरात ज्येष्ठ लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पीटर यांचे हे ट्विट रिट्विट करत ट्रम्प यांनी या सिनेमाचे कौतूक केले.

या भारत दौऱ्यादरम्यान ट्रम्प आणि मोदी यांच्यात अनेक योजनेंवर चर्चा केली जाईल. भारत दौऱ्यावर ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका देखील आले आहेत.