पत्रकार परिषद सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये हलवलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अमेरिकेत सध्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात तणाव असून त्याची झळ व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतऱ अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरु असून काही ठिकाणी दंगली आणि हिंसाचार सुरु आहे. आंदोलनकर्ते व्हाइट हाऊसच्या दिशेने जाण्यासाठी बाहेर एकत्र आले होते. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना व्हाइट हाऊसच्या भूमिगत बंकरमध्ये नेण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प जवळपास अर्धा तास बंकरमध्ये होते. यानंतर त्यांना पुन्हा वरती आणण्यात आले. हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते व्हाइट हाऊसच्या दिशेने येऊ लागल्यानंतर सिक्रेट सर्व्हिस आणि युनायटेड स्टेट्स पार्क पोलीस त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत होते. आंदोनकर्ते व्हाइट हाऊसच्या बाहेर एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची टीम आश्चर्य व्यक्त करत होती. यावेली पत्नी मेलानिआ ट्रम्प आणि मुलगा बैरॉन ट्रम्प त्यांच्यासोबत होते का याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरु आहे. अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकार्‍याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकार्‍याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. जवळपास 15 शहरांमध्ये आंदोलन सुरु असून अनेकांना अटकही करण्यात आली आहे.