डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यानंतर ‘कंगाल’ पाकिस्तानला ‘ही’ अपेक्षा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याकडे पाकिस्तानचे बारीक लक्ष लागून राहिले आहे. भारतात येऊनही पाकिस्तानला भेट न देणाऱ्या ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानच्या काही अपेक्षा आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते आइशा फारुखी यांनी सांगितले की, काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प इच्छूक असल्याचे सांगितले होते. याच मुद्यावर ते भारत दौऱ्यावर काही ठोस पावले उचलतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरमधील जनतेला भारत सरकारकडून त्रास दिला जातोय. त्यावर ट्रम्प हे भारताला विचारणा करतील असेही फारूखी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काश्मीर मुद्यावर कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेपाला भारताने विरोध केला आहे. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर पाकिस्तान काश्मीरच्या मुद्यावर मध्यस्थी म्हणून अमेरिकेने भूमिका बजावावी यावर ठाम आहे. मागील वर्षी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी म्हणून राहण्यास तयार असल्याचे सांगितले होते.