Donald Trump at Sabarmati Ashram : साबरमती आश्रम पाहून ट्रम्प यांनी ‘अभिप्राय’ दिला ‘वंडरफुल’, पण गांधीजींचा पडला ‘विसर’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आज आले आहेत. या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून ट्रम्प आणि त्यांच्या सोबत येणारे त्यांचे कुटुंब आणि वरिष्ठ मंत्री, अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, मी भारत दौऱ्यासाठी उत्साही असून आमचे ग्रँड वेलकम होणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे. 14 तासांचा प्रवास करून ट्रम्प भारतात दाखल झाले. त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर विमानतळावरून ते महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात गेले. त्यांनी आश्रमाचा संपूर्ण परिसर पाहिला. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या चरख्यावर सुतकताईंच कामही ट्रम्प दांपत्याने केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आश्रमातील विविध वस्तू ट्रम्प दांपत्याला दाखवल्या. यावेळी ट्रम्प यांना भेट म्हणून महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र देण्यात आले.
साबरमती आश्रमाची पाहणी केल्यानंतर ट्रम्प यांनी नोंद वहीमध्ये अभिप्राय नोंदवला. नोंद वहीत संदेश लिहताना ट्रम्प यांनी मोदी यांचे आभार मानले. याला अनुमती दर्शवत मेलनिया ट्रम्प यांनी देखील आपली स्वाक्षरी नोंद वहीत केली. टू माय ग्रेट फ्रेंड प्राईम मनिस्टर नरेंद्र मोदी… थँक्यू फॉर दिस वंडरफुल व्हिसीट असा मेसेज त्यांनी नोंद वहीत लिहला.

मात्र, त्यांनी महात्मा गांधी किंवा साबरमती आश्रमाबाबत काहीही लिहले नाही. याबाबत आश्चर्य़ व्यक्त होत आहे. कारण अभिप्राय नोंदवताना ट्रम्प यांना साबरमती आश्रम आणि महात्मा गांधी यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. तर मोदींचा खास उल्लेख त्यांनी या नोंद वहीत केला आहे.