‘महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहे की…’

पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी 14 जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच तुमच्या भागातील नागरिकांना मदत करा त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंचे पत्र

आज खूप दिवसांनी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांशी मी पुन्हा थेट संवाद साधतोय याचा मला मनापासून आनंद होत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचे संकट राज्यावर आणि देशावर येऊन कोसळले आणि उत्तरोत्तर ते अधिक गडद होत गेले. आजही त्याची तीव्रता कमी झाली आहे असे नाही. पण जोपर्यंत या आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोना साथीसोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल आणि सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते. गेल्या दोन तीन महिन्यांच्या कळात येणार्‍या बातम्यान मन विषण्ण झाले आहे. फक्त त्यात एकच दिलासा देणारी बाब माझ्यासाठी असायची ती म्हणजे या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणावर पदरमोड करुन, लोकांच्या मदतीला धावून ही जातोय .

अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देण्याचा , रुग्णांच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणार्‍या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत रहायचा. महाराष्ट्र सैनिकांनी या काळात केलेल्या कामाचं कौतुक मला अनेक लोकांनी व्यक्तिश कळवलं. मी मनापासून सांगतो की मी खरचं भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. बरं, हे करत असताना रोज माझा महाराष्ट्र सेनिक स्वत:चा आणि त्याच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत होता. कित्येक महाराष्ट्र सैनिकांना करोनाची लागण देखील झाली तरीही ना माझा महाराष्ट्र सैनिक मागे हटला ना त्याचे कुटुंबीय. ही ताकद येते ती महाराष्ट्रावरच्या निस्सीम आणि निर्व्याज प्रेमातून. तुमच्या या ताकदीला आणि तुमच्या कुटुंबियांच्या शौर्याला आणि त्यागाला माझा सलाम.