‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका’, मुख्यमंत्र्यांची PM मोदींकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा आकडा लक्षात घेता वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अशी मागणी केली आहे की, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 1 महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मी युजीसी परीक्षांच्या गाईडलाईनवर लक्ष केंद्रीत केलं आहे असं त्या म्हणाल्या आहेत.

वैद्यकीय आणि इंजिनियरींग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या जेईई आणि नीट या परीक्षा जुलै ऐवजी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरमध्ये होईल आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागतील. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार असून याचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागेल. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. यानंतर आता ममता बॅनर्जी यांनीही हीच मागणी लावून धरल्याचं दिसत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र या परीक्षा पुढं ढकलण्यात याव्यात अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको असं म्हणत सुरक्षित आणि निर्भय वातावरणात परीक्षा पार पडाव्यात असं बॅनर्जी म्हणाल्या आहेत. याशिवाय सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या NEET आणि JEE परीक्षाही पुढं ढकलण्यात याव्यात अशी मागणी देखील त्यांनी पीएम मोदींकडं केली आहे.

काँग्रेसची देखील तीच मागणी

सप्टेंबर महिन्यात नयोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढं ढकलण्यात याव्यात अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पीएम मोदींना पत्र लिहत केली आहे.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि कोरोन महामारीचं संकट लक्षात घेता या परीक्षा पुढं ढकलण्यात याव्यात.”