Lockdown in Pune : ‘पुण्यात 1 जूनपासून सर्वच दुकाने उघडायला परवानगी देऊ नका’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली अशा जिल्ह्यामध्ये १ जूननंतर अनलॉक सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यातच १ जूननंतर पुण्यातील व्यापाऱ्यानी दुकाने उघडण्यास परवानगी मागितली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सरसकट अनलॉक करु नका, अशी भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी देणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आपण ही भूमिका मांडू, असे मोहोळ यांनी सांगितले.

मोहोळ म्हणाले, पुण्यातील बाधितांची संख्या कमी होत असली तरी तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही. त्यामुळे टप्प्याटप्याने अनलॉक करणे गरजेचे आहे. दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णवेळ उघडी ठेवायला परवानगी द्यावी. त्यानंतर हळहळू सुट द्यावी, असे त्यांनी सांगितले.

‘आम्ही सर्व नियम पाळतो, पण १ जूनपासून दुकाने उघडू द्या’
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले सर्व नियम आणि निर्बंध पाळतो पण आम्हला १ जून पासून दुकान उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राज्यातील व्यापारी समाजाने ठाकरे सरकारला केली आहे. ३१मे ला दुकाने बंद असण्याचा कालावधी ५५ दिवसांचा होईल. यामुळे ५० लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. त्यामुळे दुकाने सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी,असे एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटले होते.

‘आता काहीही कारवाई करा, पण १ जूनपासून दुकानं उघडणारच’
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी १ जूनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं अशी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात. त्यांना राज्याच्यादृष्टीने काय चांगला निर्णय घ्यायचाय तो घेऊ दे. पण औरंगाबादसाठी आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही. कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही दुकाने उघडणार आहोत असा इशारा त्यांनी दिला.