सोडू नको तू धीर…राहूया खंबीर म्हणत संकटांशी लढण्याचा निर्धार ! मराठमोळ्या युवकाने पोवाड्यातून दिला संदेश (Video)

पोलीसनामा ऑनलाईन – सोडू नको तू धीर, राहूया खंबीर म्हणत अभिषेक शिरीष खेडकर या मराठमोळ्या युवकाने आपल्या पोवाड्यातून समाजाला संकटांशी धैर्याने सामना करण्याचा संदेश दिला आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी हा पोवाडा सोशल मीडियावर वायरल केला आहे.

या संदर्भात त्यांनी सांगितले की, कोरोना हे अनेक संकंटापैकी एक संकट आहे. त्यामुळे मनातली भीती घालवून आणि चुकीच्या गोष्टींना बळी न पडता धैर्याने या संकटाशी लढा देणे हे मराठी माणसाचे परम कर्तव्य आहे, ते विसरता कामा नये. महत्वाचे म्हणजे सर्व संकटे झेलणे, पेलणे हे मराठी रक्तातच आहे. त्यामुळे किती ही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी न खचता, न डगमगता कुठल्याही संकटाची किती ही मोठी लाट आली तरी आपला कणा ताठ ठेवणे हे आपले मराठी संस्कार आहेत.

ही आपल्या छत्रपती शिवरायांची, माता जिजाऊंची, आपल्या मराठी मातीची शिकवण आहे. कुठल्याही संकटासाठी एकमेकांना दोष न देता आपल्या स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा अशी अपेक्षा आहे. सध्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीशी लढण्यासाठी लोकांना प्रेरित करणे, त्यांचे प्रबोधन करणे तसेच येणारी पुढची पीढी शरीराने, मनाने, विचारांनी सुदृढ व्हावी या निर्मळ हेतूने पोवाडा लिहिला आहे. हा पोवाडा मी माझी सहा वर्षाची मुलगी इरा खेडकर हिच्या समवेत गायला आहे. तिने या पोवाड्याचा अर्थ समजून घेऊन तो गायला आहे. मी माझी नोकरी सांभाळून लिखाण, अभिनय आणि दिग्दशर्न ह्याचा छंद जोपासत आहे आणि याच माध्यमातून समाजातील विविध विषयांवर जनजागृती करत राहणे हे देखील मी माझे कर्तव्यच समजतो.