वंदे मातरमची जबरदस्ती करू नका, ‘या’ नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओत ‘वंदे मातरम’ ची घोषणा न दिल्यामुळे नितीश कुमार यांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता ‘वंदे मातरम’ अथवा ‘भारत माता की जय’ हे उच्चारण्यास कोणतीही अडचण नाही. पण याची जबरदस्ती करू नये, असे वादग्रस्त विधान जदयू नेते के. सी. त्यागी यांनी केले आहे. त्यागी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.

वंदे मातरम ची घोषणा न दिल्यामुळे नितीश कुमार यांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावर सारवासारव करताना के. सी. त्यागी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणा देणं, यात काही अडचण नाही. पण ज्यांना या घोषणा द्यायची इच्छा नाही. त्यांच्यावर वंदे मातरम म्हणण्याची जबरदस्ती करता कामा नये, असं त्यागी यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

अन नितीश कुमार ‘वंदे मातरम’ साठी उठलेच नाही

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारच्या दरभंगा येथे रालोआची प्रचारसभा झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषमानंतर त्यांनी आणि मंचावरील उपस्थित नेत्यांनी वंदे मातरम अशी घोषणा केली. मात्र, रालोआचे एक प्रमुख घटक असलेले नितीश कुमार हे मात्र आपल्या जागेवर बसून होते. त्यांनी वंदे मातरम ही घोषणा केली नाही. या भाषणावेळचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नितीश यांच्यावर टीका झाली होती.