यंदा कार्तिकी वारी सोहळा नकोच; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा CM कडे प्रस्ताव

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या 26 नोव्हेंबरला कार्तिकी वारी सोहळा असल्याने पंढरीत वारक-यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन होणार नाही. तसेच वारक-यांच्या तुलनेत आरोग्य यंत्रणाही तोकडी पडणार आहे. त्यामुळे यंदाची कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करावी, पांडुरंगाचे धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडतील. मात्र, वारक-यांची गर्दी होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणेला तसे आदेश द्यावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या माध्यमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे.

राज्यातील मंदिर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आल्याने पंढरीत येणा-या भाविकांची संख्याही वाढली आहे. आता दररोज दोन हजार भाविकांना मुखदर्शनासाठी सोडले जात आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून विठ्ठल- रुक्मिणी मंदिर बंद असल्याने यंदा कार्तिकी वारीसाठी वारक-यांची मोठी गर्दी होईल, त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. दोन व्यक्तीमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवल्यास सध्याची पाच किलोमीटरची रांग 25 किमी जाईल. त्यामुळे वाळवंट परिसरात 65 एकर परिसरात वारक-यांना राहता येणार नाही. तत्पूर्वी मंदिर समितीच्या ठरावावर प्रातांधिका-यांनी अभिप्राय देत तो प्रस्ताव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना पाठवला आहे. नंतर तो प्रस्ताव आता विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे गेला आहे.

याबाबत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून वारक-यांनी यंदा वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवला आहे. दरम्यान कोरोनामुळे वारक-यांनी पंढरपुरात गर्दी न करता इतरवेळी टप्प्याटप्प्याने दशर्नासाठी यावे. आता स्वतःच्या घरी अथवा गावातच वारी साजरी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर आचारसंहितेचे सावट
कार्तिकी वारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण दिले आहे. त्यादृष्टीने प्रशासन व मंदिर समितीतर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. मात्र, सध्या राज्यात पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका असल्याने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी असा प्रस्ताव विधी व न्याय विभागाला जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिली तरच उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.