‘या’ वयातील मुलांनी सहमतीने ‘सेक्स’ केल्यास गुन्हा नाही : हायकोर्ट

चेन्नई : वृत्तसंस्था – सोळा वर्षे पूर्ण केल्यानंतर मुलामुलींनी सहमतीने शरीर संबंध ठेवल्यास तो गुन्हा मानला जाऊ नये, पॉक्सो कायद्यात तशी सुधारणा सरकारने करावी, अशी महत्वपूर्ण सूचना मद्रास हायकोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान केली आहे.

सबरी नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती व्ही़. पर्थिबन यांनी पॉक्सो कायद्याबाबत मतप्रदर्शन केले.

१८ वर्षापेक्षा थोडे कमी वय असलेली मुलगी व मुलगा (वय १६ ते १८वर्षे) या दोघांमध्ये सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाल्यास हे संबंध अनैसर्गिक किंवा प्रतिकुल मानता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदविले आहे.

१७ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप याचिकाकर्त्यावर होता. याप्रकरणी नमक्कल येथील महिला न्यायालयाने पॉक्सो कायद्याअंतर्गत १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याला हायकोर्टात आव्हान दिले होते. त्याची सुनावणी न्यायमूर्ती पर्थिबन यांच्यासमोर झाली. न्यायालयाने महिला न्यायालयाचा निर्णय बदलत आरोपीची निर्दोष मुक्तता केली. शिवाय पॉक्सो कायद्यातील कठोर तरतुदी बदलण्याची सूचना केली आहे.