अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू संदर्भात विविध अफवा व्हॉट्सअप, फेसबुक सारखी समाज माध्यमे किंवा अर्धवट, चुकीची माहिती असणाऱ्या लोकांकडून पसरविल्या जात आहेत. अशा प्रकारच्या चुकीच्या, काल्पनिक, अतिरंजीत पोस्ट टाकू नये किंवा फॉरवर्ड करू नये. तसेच कुणीही अफवा पसरवू नये. अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस विभागास सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी न घाबरता स्वत:ची, कुटूंबाची व इतरांची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

कोविड – 19 नियंत्रणास येणारा लक्षणीय अडथळा म्हणजे विविध अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी आजार लपविणे, दक्षता न घेणे, आजाराचे लक्षणाकडे दुर्लक्ष करणे, स्वत:च औषधोपचार घेणे हा आहे. सद्या काही अफवांचे पीक आले आहे .

या अफवा अशा आहेत :
कोरोना हा आजारच नाही, ते एक जागतिक षडयंत्र आहे. कोरोनाने कुणाचाच मृत्यू होत नाही. कोरोना पॉझिटिव्ह आल्यास किंवा कोरोनाने मृत्यू झाल्यास डॉक्टरला दीड लाख रुपये मिळतात. पेशंटचे लिव्हर, किडनी काढून विकतात व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावतात. काढे किंवा तत्सम औषधे सातत्याने घेतो त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होवूच शकत नाही. पावसात भिजल्याने, आंबट खाल्ल्याने ताप, खोकला झालेला आहे म्हणून कोविडची तपासणी करायची गरज नाही. स्वत:लाच माहिती असलेल्या औषधांनी ठीक होईल

हॉस्पीटलमध्ये भरती झाल्यास लुट करतील. इतर रूग्णांपासून अधिक संसर्ग होईल. रुग्णाकडे दुर्लक्ष करतील. रूग्ण चांगला बोलता-चालता होता, अचानक कसा मरण पावेल. अशा अनेक अफवा, गैरसमजुतींमुळे नागरिकांत भिती पसरून ते आजार लपवितात. चाचणी करायला जात नाहीत व त्यामुळे गंभीर परिस्थिती होवून रूग्ण दगावण्याची शक्यता वाढते.

अफवांबाबत वास्तविकता अशी आहे :
कोरोना ‌विषाणूमुळे होणारा कोविड-19 हा आजार संपूर्ण जगात पसरला असून त्याने महामारीचे स्वरूप धारण केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या 79-80 टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांचेमुळे इतरांना संसर्ग होत असतो.तसेच त्यांचेतही लक्षणे वाढू शकतात. शरीरक्रियेत गुंतागुंत होवून मृत्यु देखील होवू शकतो.

20-25 टक्के लोकांत सौम्य ते मध्यम लक्षणे व 5-10 टक्के लोकांत गंभीर लक्षणे आढळतात व 2-3 टक्के रुग्णांचा मृत्यु होतो. वयोवृध्द तसेच मधुमेह, हृदयरोग, किडनी निकामी असणे व इतर गंभीर आजार अगोदरच असल्यास मृत्यु होण्याचे प्रमाण अधिक आहे.

सध्या समूह संसर्गाची अवस्था असल्याने रूग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे व उशिरा तपासणी, उशिरा निदान त्यामुळे गंभीर स्थिती होवून उपचारास प्रतिसाद मिळत नाही तसेच इतर गंभीर आजार असलेल्यामध्ये मृत्यू संख्या सुध्दा वाढत आहे.

दीड लाख रूपये मिळतात ही तर खूपच निरर्थक अफवा आहे. शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना व आवश्यक औषध खरेदी याकरिताच निधी उपलब्ध होतो.कोणत्याही शासकिय किंवा खाजगी डॉक्टरांना रूग्ण पॉझिटिव्ह दाखविल्याने किंवा रुग्णाचा मृत्यु झाल्यावर दीड लाख रूपये मिळत नाही.

किडनी सारखे अवयव काढतात ही तर गंभीर व निंदणीय अफवा आहे.कोणत्याच रुग्णाचे अशाप्रकारे अवयव काढल्या जावू शकत नाही. तसेच एखादा कोरोना बाधित रुग्ण मेल्यानंतर त्याचे कोणतेच अवयव कामी येत नाही. कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाचे शव विच्छेदन करण्यास मनाई आहे. मृत देहापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी मृत देहाची विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केली जाते व त्यांचा अंतिम विधी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच केल्या जातो.कोरोना बाधित रुग्णाचे मृत देहाचे अंत्यविधी करण्याची जवाबदारी संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देण्यात आली आहे.

आयुष मंत्रालयाचे मार्गदर्शक सुचनांनुसार आयुष काढा किंवा तत्सम औषधे डॉक्टरांचे सल्ल्यानुसार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोना किंवा इतर सांसर्गीक आजारांचा प्रतिबंध करण्यास किंवा तीव्रता टाळण्यास मदत होते. मात्र त्यामुळे अतिआत्मविश्वासाने दक्षता न घेतल्यास संसर्ग होवू शकतो.

इतर कारणांनीही ताप,खोकला होत असला तरीही सद्य:स्थितीत सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोनाची शक्यता गृहीत धरून टेस्ट करून घेणेच हिताचे आहे. स्वत:च निदान करुन स्वत:च औषधोपचार घेणे अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे कोरोना संसर्ग असल्यास उशिर होवून योग्य उपचारा अभावी गंभीर स्थिती उद्भवून धोका होवू शकतो. याकरिता वैद्यकिय सल्ल्याशिवाय अशी औषधे न देण्याबाबत औषध विक्रेत्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णसंख्येच्या मानाने संसाधने व मनुष्यबळ अपुरे वाटत असले तरी प्रशासनाव्दारे तातडीने पुर्तता करण्यात येत असून सर्व डॉक्टर्स व इतर कर्मचारी कोविड-19 नियंत्रणा करिता व रुग्णांचे जीव वाचविण्या करिता कसोशीने कार्यरत आहेत.

कोरोना विषाणूचे वेगवेगळे प्रकार (स्टेन) जगात आढळून आले असून हा कावेबाज व धोकादायक आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रुग्णाची स्थिती चांगली दिसत असली तरी अचानक गुंतागुंत होवून रुग्ण दगावू शकतो.

वरील सर्व बाबी लक्षात घेवून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आजाराबाबत कोणतीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष व सहायता केंद्राशी संपर्क साधावा.