‘कोणीही दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका’; शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद नामांतरावरून आधीच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु झाला होता. त्यावर वरिष्ठ नेंत्यानी लक्ष घालून तूर्त तरी या वादाला पूर्णविराम दिला आहे. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवरून काँग्रेस-शिवसेना यांच्यातील वाद सध्या पेटला असल्याचे समोर आले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा ज्या पद्धतीने सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करत आहेत, माध्यमासमोर बोलतायेत त्यावरून कुठेतरी काँग्रेसला भाजपाच्या दावणीला बांधण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे असा आरोप जाधव यांनी पत्रकार परिषद केला आहे.

यशवंत जाधव म्हणाले की, चिखलात रुतलेल्या कमळात हात घालण्याचे काम विरोधी पक्षनेते करत आहेत. माध्यमासमोर बोलत असताना ते साफ चुकीचं वक्तव्य करत आहेत. विरोधीपक्ष नेते सध्या संभ्रावस्थेत असून त्यांना नक्की कोणाचं ऐकायचं हा प्रश्न पडला आहे, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांचे ऐकायचं की प्रदेशाध्यक्षांचे? मंत्र्यांचे ऐकायचे की पालकमंत्र्यांचे? या द्विधावस्थेत विरोधी पक्षनेते आहेत. मागील निवडणूक आम्ही स्वबळावरच लढलो होते, त्यामुळे आम्हाला स्वबळ काय हे चांगले माहिती असून कोणीही दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका. आजही शिवसेना स्वबळावरच सत्तेत आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला बजावलं आहे.

भाजपाच्या साथीने कोविड निधी रोखण्याचं काम काँग्रेसन केले असल्याचे सांगत जाधव म्हणाले, विरोधी पक्षनेते बेछूट आणि चुकीचे आरोप करत आहे. अद्यापही कोविडचं संकट कायम आहे, त्यासाठी उपाययोजना करण्यास निधीची गरज आहे. पण भाजपाच्या भूमिकेला काँग्रेसने साथ दिली आणि बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला. कोविड काळात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्याची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. अहवाल आल्यानंतर कारवाई होईल. परंतु संकट अजुनही संपलेले नसताना आडमुठी भूमिका घेणे योग्य नाही असंही ते म्हणाले.

काँग्रेसच्या नगरसेविकेला बजावली नोटीस
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याप्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहॉ सिद्धीकी यांना चिटणीस विभागाने नोटीस पाठवली आहे. मात्र काँग्रेसने यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना जबाबदार धरले आहे. सिद्धीकी या मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भगिनी आहेत. हे काँग्रेस विरोधात षडयंत्र असून स्थायी समिती अध्यक्षांच्या दबावाखाली काम सुरू आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला.