निवडणूक प्रचारात संरक्षण दलातील जवानांचे छायाचित्र वापरू नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही राजकिय पक्षाने संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारात वापरू नये. अशी सक्त ताकिद निवडणूक आयोगाने दिली आहे. पाकिस्तानाचे विमान पाडल्यानंतर पाकच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या छायाचित्रांचा वापर राजकिय पक्षांकडून केला जात आहे. त्याला संरक्षण दलाने यावर तीव्र आक्षेप घेत निवडणूक आयोगाला यासंदर्भात माहिती दिली होती. राष्ट्रीय व स्थानिक पक्षांना याबाबत योग्य सुचना देण्याची विनंती संरक्षण दलाकडून करण्यात आली होती.  त्यानुसार निवडणूक आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानच्या खुरखोरी करणाऱ्या विमानांचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान पाकिस्तानात सापडले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र देशातील राजकिय पक्ष, नेतेमंडळींकडून अभिनंदन, पुलवामा हल्ला, आणि इतर गोष्टींचा वापर आपल्या निवडणूक प्रचारासाठी करण्यात येत आहे. संरक्षण दलातील अधिकाऱ्यांचे छायाचित्र त्यांच्या पोस्टर्सवर झळकत आहे. याची माहिती संरक्षण दलाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली. त्यावर निवडणूक आयोगाने संरक्षण दलातील अधिकाऱ्यांची छायाचित्रे न वापरण्याची सक्त ताकीद राष्ट्रीय तसेच स्थानिक पक्षांना दिली आहे.

भारतीय सशस्त्र सेना या देशाच्या रक्षणकर्त्या आहेत.  त्या भारताच्या संरक्षण आणि राजकिय व्यवस्थेचे अग्रणी आहेत. भारतीय सेना ही आधुनिक लोकशाहीतील अऱाजकिय आणि तटस्थ आहे. त्यामुळे राजकिय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांच्या राजकिय प्रचारावेळी भारतीय सेनेचे संदर्भ देताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही लष्करी प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, किंवा लष्करी कारवाईचे छायाचित्र कोणत्याही राजकिय प्रचार, जाहिरात, किंवा निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही राजकिय पक्ष, नेत्याने वापरू नये. त्यासोबतच आपापल्या नेत्यांना याची ताकिद दिली जावी असे निवडणूक आयोगाने राजकिय पक्षांच्या नावाने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.