‘काळजी करू नका हे शेतकऱ्यांचं सरकार, नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही’ : CM उध्दव ठाकरे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पोहोचले आहेत. सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ठाकरेंसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना तुम्ही एकटे नाहीत. सरकार तुमच्या पाठीशी आहे अशा शब्दात ठाकरेंनी ग्रामस्थांना दिलासा दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्ही एकटे नाहीत. कोणीही वाऱ्यावर पडलं नाही. आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे. तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. काळजी करू नका. नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध रहा. किती नुकसान झालं याचे पंचनामे सुरू आहेत. माहिती गोळा केली जात आहे. परंतु माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. लवकरच मदत जाहीर करू” असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं.

तसंच विरोधी पक्षानं राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये. केंद्राकडून राज्याला जे देणं आहे, असेल ते केंद्रानं राज्याला द्यावं असंही सीएम ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच वाद निर्माण झाला होता. सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असं सांगितलं गेलं. परंतु पुलावरून नुकसान भरपाईची पाहणी कशी करणार असा सवाल गावकऱ्यांनी केला आणि मुख्यमंत्री गावात आले तर ठिक नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. परंतु सुरक्षेचं कारण देत प्रशासनानं गावकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर काही गावकऱ्यांना रस्त्यावर बोलवण्यात आलं. या लोकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.