दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारमधील ‘या’ मंत्र्याने दिली पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी काल (२६ जानेवारी) ट्रॅक्टर मोर्चाचे काढला. या मोर्च्यादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये हिंसाचार घडला. त्यात ३०० पेक्षा अधिक पोलीस जखमी तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर गृहमंत्रालयाकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत असून, त्या अनुषंगाने शेतकरी आणि संवाद संपून प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक दिलासादायक विधान केलं आहे.

चर्चेची दारे बंद झाल्याचे आम्ही कधीही म्हणालो नाही, असे जावडेकर यांनी म्हटलं. हिंसाचारानंतर मागील २४ तासांपासून मोदी सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्याच पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी केलेलं विधान महत्वाचे मानले जाते.

आज केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना विचारले असता, जावडेकर म्हणाले, “चर्चेची दारे बंद झाल्याचे तुम्ही केव्हा ऐकले? जेव्हा काही होईल, तेव्हा तुम्हाला सांगू,” असे उत्तर त्यांनी दिले.

दरम्यान, कृषी कायद्यासाठी झालेल्या ११ बैठका निष्फळ ठरल्या. दीड वर्षासाठी कृषी कायद्यांना स्थगिती देण्यात येईल, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली. मात्र, ही ऑफर शेतकरी संघटनांनी अमान्य केली. तिन्ही कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.