दौंड : ‘डबल ढोलकी’ ट्रेंडचा तालुक्यात मोठा ‘धुमाकूळ’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – विधानसभा निवडणुकीत छुप्या, उघड, पद्धतीने काम करायचे एकाचे आणि ज्याच्या विरोधात काम केले आहे तो उमेदवार निवडून आला की सर्वात प्रथम त्याच उमेदवाराचा सत्कार करायचा आणि आम्ही तुमचेच आहोत बरं का हे भासवायचे असा काहीसा प्रकार सध्या तालुक्यामध्ये मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. याच ट्रेंडला आता कट्टर कार्यकर्त्यांनी “डबल ढोलकी ट्रेंड” असे नाव दिल्याने तालुक्यामध्ये अश्या डबल ढोलकींची चर्चा मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आहे आणि त्यामुळे अश्या डबल ढोलकींचे चेहरे मात्र आता पाहण्यासारखे झाले आहेत.

तालुक्यामध्ये नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक मंडळींनी “डबल ढोलकी हा ट्रेंड” जोपासत येईल तो आपला हे ब्रीद वाक्य अंगिकारले. विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी अनेकजण एका पार्टीत असल्याचे भासवून दुसऱ्या पार्टीचा प्रचार करताना दिसले. आणि चाणाक्षपणे काम करणाऱ्या काही कट्टर कार्यकर्त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये असे अनेकजण कैद झाले, तर काहीजण लोकांना पैश्यांच्या अफवा पसरवून फितवताना आढळून आले. त्यामुळे बोटावर मोजता येतील असे कट्टर कार्यकर्ते सोडले तर अनेकजण या ट्रेंडचा शिकार झालेले दिसून आले.

मतमोजणीच्या दिवशी मात्र नियतीनेही अश्या लोकांना उघडे पाडले. ज्या कार्यकर्त्याचा हा नेमका कुणाचे काम करतोय याचा थांगपत्ता लागत नव्हता ते कार्यकर्ते एका अफवेमुळे फटाके आणि गुलाल घेऊन थेट चौका-चौका मध्ये जमा झाले आणि आपला उमेदवार निवडून आला आहे या अफवेला बळी पडून रॅली काढून नाचू लागले. त्यामुळे मतदानादिवशी छुप्यापद्धतीने पलीकडील उमेदवाराचे काम करत असल्याचे भासवणारे डबल ढोलकी धारक थेट रॅलीत सामील झाले आणि कसा चंदन लावला असे म्हणत घोषणा देऊ लागले, काही डबल ढोलकींनी समोर न येता थेट वार्ड प्रमुख, प्रचार प्रमुखांना फोन लावून आणला का नाय आपला उमेदवार निवडून असे म्हणत शुभेच्छा देऊन हॉटेलवर या आणि ओली पार्टी द्या असे आदेशच सोडले मात्र तेवढ्यात पुन्हा एक खरीखुरी खबर आली आणि आपला उमेदवार निवडून आलाच नाही तर समोरील उमेदवार निवडून आला आहे हे सर्वांच्या लक्षात आले.

डबल ढोलकींनी सर्व ओले बेत कॅन्सल केले, उमेदवार पडलेल्या कार्यकर्त्यांना नुकतेच केलेले फोन कॉल्स आपल्या डायल लिस्टमधून रिमूव्ह केले आणि काही डबल ढोलकींनी अंगावर घेतलेला गुलाल ही त्वरित धुवून टाकला. पुन्हा इस्तरीचा दुसरा ड्रेस चढवून आम्हाला माहीतच होते की आपलेच शीट लागणार असे म्हणत पुन्हा बे एके बे सुरू केले. निकालाची धामधूम संपली निवडणुकीत खऱ्या अर्थाने आदबणारे कार्यकर्ते अनेक दिवसांच्या श्रमाने दमून लवकरच झोपी गेले सकाळी झोपेतून डोळे उघडून सोशल मीडिया चाळताना अचानक बिछान्यामध्ये ताडकन उठून बसले कारण… ज्यांनी वातावरण निर्मिती पाहून आपल्या उमेदवारांसोबत गद्दारी करून आतून विरोधी उमेदवाराचे काम केले होते ते तालुक्यातील अनेक डबल ढोलकी हातात गुच्छ घेऊन विजयी उमेदवारांच्या घरी पोहोचले होते आणि चेहऱ्यावर खोटे हास्य आणून काढलेले फोटो शेअर करत होते. हेच चित्र संपूर्ण तालुक्यातील गावांमधून पहायला मिळत होते त्यामुळे अखेर न रहावून खरे कार्यकर्तेही पेटून उठले.. कुणी, कुठे आणि कसे काम केले याचा लेखाजोखाच त्यांनी तयार केला आणि आपल्या उमेदवाराला सोशल मीडियावर आर्त हाक देऊन “डबल ढोलकिंपासून सावध रहा” असे मेसेज फिरवू लागले आहेत.

या खऱ्या कट्टर कार्यकर्त्यांनी आता डबल ढोलकींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग पुरावे म्हणून तयार ठेवले आहेत आणि वेळ पडताच ते नेत्यांसमोर आणून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले जाणार आहे त्यामुळे तालुक्यातील डबल ढोलकिंमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता पसरली असून आता काय करायचे या विचाराने सध्या ते चिंताग्रस्त बनल्याचे दिसत आहेत.

Visit : Policenama.com