संतापजनक ! ५ लाखांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर येथे २१ वर्षीय नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ५ लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. तर जोवर आरोपींना अटक करत नाही तोवर शवविच्छेदन करू दिले जाणार नाही. असा आक्रमक पवित्रा तिच्या नातेवाईकांनी घेतला असून त्यांना जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला आहे.

अमृता तांबे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर याप्रकरणी तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अमृता हिचा १ वर्षांपुर्वी शरद तांबे याच्यासोबत झाला होता. थाटामाटात कुटुंबियांनी तिचा विवाह करून दिला. शरदकडे एक जेसीबी असतानाही तो तिला आणखी एका यंत्रासाठी ५ लाख रुपये मागत होता. सोमवारी सकाळीदेखील अमृताने भावाला फोन करून याची माहिती दिली होती. त्यानंतर तिने दुपारी सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समजलं. असा आरोप तिचा भाऊ अनिल चव्हाण याने केला आहे.

सासू, पती, त्याची बहिण तिचा पाच लाख रुपयांसाठी सतत छळ करत होते. असा आरोप तिच्या भावाने केला आहे. तिने सोमवारी दुपारी १ च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह रात्री जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तेव्हा दोषींना अटक करत नाहीत तोपर्यंत अमृताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा तिच्या कुटुंबियांनी घेतला आहे.