सांगलीत 7 आमदारांसह डझनभर नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आ. सुमन आर. पाटील अन् मुलगा रोहितला देखील संक्रमण

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. सांगली जिल्ह्यातील सात आमदरांसह तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते कोरोना संसर्गाबाबत अधिक सतर्क झाले आहेत. सांगली जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोड, सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर.आर. पाटील हे देखील कोरोना बाधित झाले आहेत.

जिल्ह्यातीन नेत्यांना कोरोना व्हायरसने आपल्या कवेत घेतल्याचे पहायला मिळत असल्याने कार्यकर्ते देखील पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या काही महिन्यापासून सांगलीत कोरोनाच्या संकटात मास्क, सॅनिटायझर, औषध वाटप करण्यासाठी राजकीय नेते व कार्यकर्ते काम करत आहेत. पक्षांच्या बैठका, आंदोलने, शासकीय नियोजन बैठका याना ते उपस्थित रहात होते. हे काम करत असताना कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या हे सर्व कार्यकर्ते आणि नेते क्वारंटाईनमध्ये असल्याने राजकीय क्षेत्रच क्वारंटाईन झाल्याची स्थिती आहे.

मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे हे कोरोनामुक्त झाले असून काही दिवस त्यांना घरातच विलगीकरण करुन घ्यावे लागणार आहे. राजकीय नेत्यांसह त्यांचे कुटुंबीय, वाहनचालक, कार्यकर्ते यांनाही संसर्ग झाला आहे. राजकीय क्षेत्रातील बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सांगलीतील माजी महापौर हरुण शिकलगार यांचा मृत्यूसुद्धा अनेकांना धक्का देऊन गेला. त्यामुळे सांगलीचे राजकीय क्षेत्रसुद्धा आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे दिसत आहे.