लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् बनले ‘डॉक्टर फॉर बेगर्स’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येकजण घरात बसून आहे. व्हायरसच्या भीतीमुळे जवळचे नातेवाईकही दुरावले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही डॉ. सोनवणे दाम्पत्य रस्त्यावर राहणार्‍या भिक्षेकर्‍यांवर मोफत उपचार करत आहेत. डॉ. अभिजीत आणि मनिषा सोनावणे हे कार्य 2015 सालांपासून करत आहेत. लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून भिकार्‍यांसाठी काम करत डॉक्टर फॉर बेगर्स अशी त्यांची ओळख झाली आहे.

डॉ. सोनवणे दाम्पत्य केवळ भिक्षेकर्‍यांवर उपचार करुन त्यांना आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील रस्त्यावरच्या मंदिर आणि मशिदीबाहेरच्या दिव्यांग आणि भिक्षेकर्‍यांना तपासून मोफत वैद्यकीय सुविधांही देत आहेत. भिक्षेकर्‍यांच्या हाताला काम देऊन, त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याचेही काम ते करत आहेत. डॉ. सोनवणे मूळचे म्हसवडचे (ता. माण, जि. सातारा) असून पत्नी मनीषा दोघांनीही ‘बीएएमएस’चे शिक्षण घेतले. लग्नानंतर राहायला घर नव्हते. रुग्णालय सुरू करायलाही पैसे नव्हते. डॉ. अभिजित मित्रांकडे, तर डॉ. मनीषा अनेक वर्षे मैत्रिणीकडे राहायची. आर्थिक चणचण होती. नैराश्येत मंदिरात असताना तिथल्या एका भिक्षेकरी आजोबांशी त्यांचा संबंध आला. ते आजारी असल्याने डॉ. अभिजित यांनी त्यांच्यावर मोफत उपचार केले. त्या बदल्यात आजोबांनी भरपूर पैसे दिले. श्रीमंत मुलाने त्यांना घरातून बाहरे काढले होते. आजोबांनी ‘तुम्ही डॉक्टर आहात. डोक्यातून अभद्र विचार काढून टाका. आपत्ती जातील,’ अशा शब्दांत नैतिक आधार दिला. डॉक्टर दाम्पत्याचे मतपरिवर्तन झाले. डॉ. सोनवणेंनी दोन पिशव्या भरून औषधे घेतली. ते घरोघरी जाऊन कोणी रुग्ण आहे का, विचारून गोळ्या द्यायचे आणि पैसे घ्यायचे. पैशाबरोबरच कित्येकदा अपमानही व्हायचा. याच रस्त्यावरून फिरताना वाटेत भिक्षेकरी भेटायचे. ते डॉक्टरांना आजार सांगायचे. डॉक्टर गोळ्या द्यायचे. भिक्षेकरीच आठ आणे, रुपया गोळा करून डॉक्टरांना खर्चायला द्यायचे. त्यांना खाऊ घालत असल्याची आठवण त्यांनी सांगितली.