पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dr Ajit Ranade | मागील काही दिवसांपूर्वी गोखले इन्स्टिट्यूटच्या (Gokhale Institute) कुलगुरू पदाच्या नियुक्तीचा वाद चांगलाच चर्चेत होता. याठिकाणी डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर रानडे यांच्याकडे कुलगुरूपदासाठी आवश्यक असलेल्या किमान पात्रता नसल्याचा आरोप झाला होता.
त्यानंतर हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला होता. दरम्यान आता डॉ. रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे. गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले आहे.
डॉ. रानडे यांनी डॉ. सन्याल यांना राजीनाम्याचे पत्र सादर केले आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. देशातील सर्वांत चांगल्या संस्थांपैकी एक असलेल्या गोखले संस्थेचे अडीच वर्षांसाठी नेतृत्त्व करण्याची संधी दिल्याबद्दल व्यवस्थापन मंडळ, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, प्राध्यापक आणि कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य सर्व भागीदार घटकांचे आभार. उत्कृष्टता साध्य करण्यासाठी संस्थेला शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच माझा राजीनामा संस्थेच्या कुलगुरूपदी २०२१ मध्ये झालेल्या माझ्या नेमणुकीसाठी कोणत्याही पद्धतीने त्रुटी किंवा अपात्रता दर्शवत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
डॉ. रानडे यांच्याकडे कुलगुरू पदासाठी आवश्यक पात्रता नसल्याचा आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या. तत्कालीन कुलपती डॉ. विवेक देबरॉय यांनी सत्यशोधन समिती नियुक्त करून समितीच्या शिफारसीनुसार डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला डॉ. रानडे यांनी न्यायालयात आव्हान दिले.
न्यायालयाने डॉ. देबरॉय यांच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. रानडे यांना दिलासा दिला. त्यानंतर डॉ. देबरॉय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संजीव सन्याल यांची कुलपती पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी डॉ. रानडे यांच्यावरील कारवाईचे पत्र मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता.