सामाजिक बांधिलकी ! सोलापूरच्या डॉक्टरांनी उद्घाटनापूर्वीच दवाखाना दिला कोरोनाच्या रूग्णांसाठी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूर येथील एका डॉक्टरांनी तेथे ६ मजली रुग्णालय बांधले होते. तेच रुग्णालय त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून उद्घाटनापूर्वीच कोरोनाबाधित रुग्णांसाठी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक सोयीस्कर आणि योग्य वेळी बेड उपलब्ध होणार आहे. तेथे आता कोरोना रुग्णांसाठी आणखी एक रुग्णालय मिळाले आहे. या डॉक्टरांचे नाव अमजद सय्यद आहे. सय्यद यांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक अनेक स्तरातून होत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने, अनेक राज्याची तुलना करता महाराष्ट्र हा कोरोनाबाधित रुग्णात आघाडीवर आहे. अशा बिकट परिस्थितीत रुग्णांना बेड, आणि अनेक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र समोर आहे. यांमुळे डॉ. अमजद सय्यद यांनी पुढाकार घेते आपले हॉस्पिटल त्यांनी रुग्णांसाठी दिले आहे. रुग्णालयाचे उदघाटन न करताच त्यांनी रुग्णाच्या सहकार्यासाठी पुढे सरसावले आहे. सय्यद म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढत असून खाटांची संख्या कमी पडत आहे, अशा वेळी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. कोरोनामुळे नाहक लोकांचा बळी जात आहे, त्यांचे जीव वाचवण्यासाठी मी माझे रुग्णालय दिले, यात मला समाधान आहे, उद्घाटन आज नाही तर उद्या होईल ते महत्त्वाचे नाही, अशा कठीण प्रसंगी मी उपयोगाला आलो हे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

सोलापूर येथील डॉ. अमजद बशीर अहमद सय्यद हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी नुकतेच ६ मजली रुग्णालय सुरू केले असून त्याठिकाणचे फर्निचरचे कामंही अद्याप पूर्ण झाले नव्हते. तसेच, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनसह इतर सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे. याचा विचार करून अमजद सय्यद यांनी त्यांचे ‘नोबेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ नावाचे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानंतर महापालिका प्रशासनास त्यांनी प्रस्ताव पाठवला, महापालिका प्रशासनाने रुग्णालयाची पाहणी करून लगेच तो प्रस्ताव मान्य केला आहे. या दरम्यान, रुग्णालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर २५ ऑक्सिजनचे बेड तयार आहेत. तसेच २५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी रुग्णालयाने वैद्यकीय कर्मचारीसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत.