‘प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल’

सिंदखेडराजा : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या, तर शिवबा जन्माला येईल असं वक्तव्य अभिनेते आणि शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. इतकेच नाही तर आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करा असंही ते म्हणाले. सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जन्मोत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजामाता यांच्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, “जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यामुळे प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला यायला हव्यात. कारण प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल.” इतकेच नाही तर, प्रत्येकानं आपल्या मनातला शिवविचार जागा ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याचाही सल्लाही त्यांनी  दिला
कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हेंनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेवरही भाष्य केल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, “या मालिकेत लवकरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे. हा सोहळा रायगडावर चित्रित केला जावा, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी खासदार संभाजी राजे यांच्याशी संवाद साधला आहे. आता महाराजांची इच्छा असेल, तर राज्याभिषेकाचा सोहळा नक्कीच रायगडावर चित्रित होईल.” पुढे त्यांनी  ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल उपस्थितांचे आभार मानले.