डॉ. अशोक विखे ‘राष्ट्रवादी’कडून इच्छुक ?

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे जेष्ठ सुपुत्र डॉक्टर अशोक विखे पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
याच मतदारसंघातून त्यांचे पुतणे डॉ. सुजय विखे हे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही आहेत. डॉ. अशोक हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू असले तरी दोघांमध्ये विळा-भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विखे विरुद्ध विखे अशी लढत तर होणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
 डॉ. अशोक विखे पाटील हे आंतरराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य व औषध प्रशासन संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आग्रही आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ही उमेदवारी मागितली जात आहे. परंतु ऐनवेळी त्यांचे चुलते अशोक विखे पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यांनी बंद खोलीत चर्चा केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली. विखे पाटील हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांना स्वतःहून उमेदवारी देण्यासाठी पवार यांनी अशोक विखे यांना उमेदवारी देण्यासाठी बोलावून घेतले नाही ना, अशी चर्चा सुरू झालेली आहे. डॉ. अशोक व राधाकृष्ण विखे-पाटील हे दोघेही दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे सुपुत्र असले तरी दोघांमधील वाद चांगलाच चर्चेचा विषय आहे. अशोक विखे यांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या तयारीच्या वृत्ताने नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.