डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर ! प्रभातफेरी, मिरवणूकांना बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (दि.14 एप्रिल) साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच प्रभातपेरी, बाईक रॅली, मिरवणूकांवर बंदी घातली आहे. शासनाकडून चैत्यभुमी, दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. नागरिकांनी चैत्यभुमीवर न येता घरातूनच डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहन केले आहे. या संदर्भात राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे
दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येतात. तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन डॉ. आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातपेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी काढू नयेत. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

चैत्यभुमी, दादर येथे भारतरत्न डॉ. आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी फक्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच दिक्षाभूमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींना परवानगी दिली आहे. चैत्यभुमी येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दीवर निर्बंध घालण्यात आले आहे.