महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला जनसागर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. आज देशभरातील अनुयायी मुंबईतील शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. कालपासूनच येथे भिमसैनिकांची गर्दी वाढू लागली आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीने ओसंडून वाहत आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी चैत्यभूमी परिसरात विशेष सोय करण्यात आली आहे.

मोठ्या संख्येने अनुयायी येथे येत असल्याने मध्यरात्रीपासूनच दादर रेल्वेस्थानकाच्या परिसरामधील गर्दी वाढू लागली आहे. झेंडे, फिती, बाबासाहेबांचे फोटो असलेले बिल्ले घेऊन जय भीमच्या घोषणा देत ही गर्दी चैत्यभूमीकडे जात आहे. महापरिनिर्वाणदिनाच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या परिसरामध्ये ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. बेस्टतर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे ३०१ अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. तसंच शिवाजी पार्क आणि मैदान परिसरात १८ फिरती शौचालये, रांगेत उभे असणाऱ्यांसाठी चार फिरती शौचालयांची सुविधा देण्यात आली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर्स उभे करण्यात आले आहेत.

अनेक अनुयायांना मोबाइल फोन रिचार्ज करण्याची समस्या भेडसावत असते. त्यांच्यासाठी ३०० पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुयायींना दादरला पोहोचता यावे यासाठी मध्य रेल्वेकडू रात्रीच्या वेळी विशेष लोकलची सुविधा देण्यात आली आहे. यंदाही येथे मोठ्याप्रमाणात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. या स्टॉलमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अशा विविध शहरांतील प्रकाशन संस्थांच्या स्टॉलचा समावेश असेल. विविध ठिकाणांहून आलेल्या संस्थांकडून सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री येथे करण्यात येत आहे. पुरोगामी विचार, चळवळी, महापुरुषांची चरित्रे, स्पर्धा परीक्षांची पुस्तके यासोबतच भारतीय संविधानाची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, महात्मा फुले, शाहू महाराज, महापुरुषांची चरित्रे असे विविध ग्रंथ उपलब्ध आहेत.