डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या २५ वर्षांनंतर कायापालट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन (अक्षय पुराणिक) – सिम्बॉल ऑफ नॉलेज असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारण्यात आला होता. या लढ्याचा यशस्वी शेवट मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराने झाला.

नामविस्तार दिनाचे सिंहावलोकन करताना विद्यापीठाने मागील २५ वर्षांत मोठी झेप घेतली आहे. नामविस्तारानंतर विद्यापीठ तिसऱ्यांदा ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जात आहे. पहिल्या ‘नॅक’मध्ये ‘ब’ प्लस दर्जा मिळाला होता. दुसऱ्या ‘नॅक’मध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त केला. तिसऱ्या सायकलचे मूल्यांकन काही दिवसांतच होणार आहे. त्यातही विद्यापीठ ‘अ’ प्लस दर्जा मिळवील. विद्यापीठाने गुणवत्ता आणि संशोधनासाठी ‘आयक्वॅक’ची स्थापना केली.

यासाठी संचालक, समन्वयक, सल्लागार, दोन संगणक सहायक, ७ प्राध्यापक समन्वयक कार्य करीत आहेत. अशा पद्धतीची रचना केलेल्या ‘आयक्वॅक’ विभागाची निर्मिती करणारे हे राज्यातील एकमेव विद्यापीठ असल्याचा दावाही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केला. संशोधनाच्या क्षेत्रातही विद्यापीठातील विविध विभागांची घोडदौड सुरूच आहे. देशात रामानुजन जिओ स्पेशल चेअर, मौलाना आझाद चेअर देशात ६ विद्यापीठांमध्ये आहेत. त्यातील एक आपल्याकडे आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. नुकतीच दीनदयाल उपाध्याय चेअर मंजूर झाली. त्यासाठीही ५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
नामविस्तारात मिळालेल्या विभागांची प्रगती
मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्याचा शासन निर्णय निघाला. तेव्हाच मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणकशास्त्र, पर्यटन आणि रसायन तंत्रज्ञान हे नवे विभाग मंजूर केले. यासाठी प्रत्येकी चार प्राध्यापकांच्या पदांना मंजुरी दिली. या २५ वर्षांत तिन्ही विभागांनी मोठी प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात तात्काळ रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमात त्यांची गणना होते.
पर्यटनशास्त्र विभागाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रगडे आणि प्राध्यापिका डॉ. माधुरी सावंत यांनी आतापर्यंत १३ संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. देश-विदेशातील ३२ समित्यांवर कार्य करीत आहेत. विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर लाखो रुपयांचेपॅकेज मिळाले आहे. संगणकशास्त्र विभागात सद्य:स्थितीत डॉ. के.व्ही. काळे, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. भारती गवळी यांच्यासह १२ प्राध्यापक कार्यरत आहेत. मागील २५ वर्षांत या विभागाने ५० पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. ज्याची किंमत १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
विभागातील प्राध्यापकांनी ५ पेटंट मिळवलेअसून, तब्बल ८४ विद्यार्थी संशोधनाचे काम करीत असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ.  गवळी यांनी दिली. केमिकल टेक्नॉलॉजी विभागात १० प्राध्यापक आहेत. या प्राध्यापकांनी १० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे संशोधन प्रकल्प पूर्ण केले असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिली. यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रवीण वक्ते आणि  डॉ. सचिन भुसारी यांनी पेटंट मिळवले आहे.
१८०० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित
विद्यापीठातील विभागांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांनी मागील १५ वर्षांत १८०० पेक्षा अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. याशिवाय विविध परिषदांमध्ये २० हजारपेक्षा अधिक शोधनिबंधांचे वाचन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us