आनंदाची बातमी ! लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवण्यासाठी ब्रिटन शासनाकडून ‘ग्रीन सिग्नल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लंडन येथील आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल याप्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिला आहे, अशी माहिती माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. लंडन येथील 10 किंग हेनरी रोड, एनडब्लू 3 वास्तूमध्ये डॉ. आंबेडकर यांचे स्मारक बनविण्याचा निर्णयाला तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने आक्षेप घेतला होता आणि स्मारक बनविण्याची विनंती फेटळली होती.

महाराष्ट्र सरकारने ब्रिटन सरकारकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ब्रिटन सरकारच्या शहर नियोजन विभागाचे निरीक्षक केरी विल्यम्स यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीपुढे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडण्यात आली, अशी माहिती तत्कालीन सामाजिक  न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

म्युझीयम डी-1 मध्ये रुपांतर
लंडन येथील 10 किंग हेनरी रोड, एनडब्लू 3 वास्तूचे निवासी क्षेत्रातून म्युझीयम डी 1 मध्ये रुपांतर करण्यास परवानगी देण्यास आली आहे. तसेच या वास्तूमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संरक्षक भिंत, रेलिंग व दिव्यांगासाठी लिफ्टचे काम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने उपस्थित केलेल्या आक्षेपांवर उत्तर देताना असे सांगण्यात आले की, ज्यावेळी ही वास्तू विकत घेतली, त्यावेळी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिचे तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक होते.