WHO च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष बनले डॉ. हर्षवर्धन,’कोरोना’च्या महामारी दरम्यान बजावणार महत्वाची भूमिका

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धादरम्यान शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी दिल्लीतील डब्ल्यूएचओ कार्यालयात सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. पूर्वी या पदाची जबाबदारी जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडे होती, जे 34 सदस्यीय मंडळाचे अध्यक्ष होते. संपूर्ण जग कोरोना विषाणूविरूद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत डॉ. हर्षवर्धन कोरोनाबरोबरच्या या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

कार्यभार सांभाळल्यानंतर डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, हे मला ठाऊक आहे की जागतिक संकटाच्या वेळी मी या कार्यालयात प्रवेश करत आहे. पुढील 2 दशकांमध्ये आरोग्याविषयी अनेक आव्हाने समोर असतील. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र लढा देऊ. ते म्हणाले की, भारत सध्या निर्धाराने कोरोनाशी लढा देत आहे. यामुळे, भारतात कोरोनाचा मृत्यू दर फक्त 3 टक्के आहे. त्याच बरोबर 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त एक लाख प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह, भारतात पुनर्प्राप्तीचा दर 40 टक्क्यांहून अधिक आहे.

तत्पूर्वी 194 देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीमध्ये भारताकडून हर्षवर्धन यांच्या नावाची निवड बिनविरोध करण्यात आली. डब्ल्यूएचओच्या दक्षिण पूर्व आशिया समूहाने गेल्या वर्षी एकमताने निर्णय घेतला होता की भारताला तीन वर्षांच्या मुदतीसाठी कार्यकारी मंडळावर निवडले जाईल. बोर्डाचे अध्यक्षपद एका वर्षाच्या आधारावर अनेक देशांच्या वेगवेगळ्या गटात दिले जाते. मागील वर्षी निर्णय घेण्यात आला होता की पुढील एका वर्षासाठी हे पद भारताकडे राहील.

मंडळाची बैठक वर्षातून दोनदा होते. त्याची मुख्य बैठक सहसा जानेवारीत असते तर दुसरी बैठक मे मध्ये होते. कार्यकारी मंडळाचे मुख्य कार्य म्हणजे आरोग्य असेंब्लीचे निर्णय आणि धोरणे तयार करण्यासाठी योग्य सल्ला देणे हे असते. डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळात समाविष्ट 34 सदस्य हे आरोग्य क्षेत्रातील कुशल तज्ञ असतात. ज्यांना 194 देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीमधून 3 वर्षांसाठी मंडळावर निवडले जाते. मग यातील सदस्यांमधून एक-एक वर्षासाठी अध्यक्ष ठरविले जातात.