डॉ. जगन्नाथ दीक्षित स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसातून फक्त दोनदाच जेवा, एकावेळी जेवताना ५५ मिनिटात जे खायचे ते खा. असा स्पेशल डाएट प्लॅन सांगणारे लातूरचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे. राज्य सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून डॉ. दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. दीक्षितांनी सांगितलेली स्वास्थ्यशैली जनमानसात लोकप्रिय झाली असून अनेक जणांनी त्याचे अनुकरण सुरु केले आहे.

डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना सोमवारी नियुक्तीचे पत्र दिले. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्थूलता नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. स्थूलतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेअंतर्गत डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, अशी आशा शासनाने व्यक्त केली आहे.

शारीरिक स्वास्थ्याचे आहाराशी असलेल्या नात्याबाबत संशोधन करुन डॉ. दीक्षित यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून ‘दीक्षित डाएट प्लॅन’ नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.

या स्पेशल डाएट प्लॅनचा खूपच प्रसार झाला असून अनेकांनी त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. सकाळी  आणि रात्री असे दोनच वेळा खा. दोन्ही वेळा निश्चित करा व दर रोज त्यावेळी संपूर्ण जेवण करा. त्यात त्यांनी कोणतेही खाणे वर्ज्य अथवा हे खा, हे खाऊ नका असे काहीही सांगितले नाही. केवळ जे काही जेवण करणार आहात. ते ५५ मिनिटांमध्ये संपवा. त्यानंतर पुढे काही खाऊ नका, असा हा साधा डाएट प्लॅन आहे.

शासनाच्या निर्णयामुळे अत्यंत आनंद झाल्याच्या भावना डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केली. गेल्या सहा वर्षांपासून काम सुरु होते. मात्र शासनाच्या मान्यतेमुळे पुढील मार्ग सोपा झाल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्य आणि देशात जाऊन ही पद्धत पोहचवणे सुकर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या सहकाऱ्यांना आधार मिळाल्याची प्रतिक्रियाही यावेळी डॉ. दीक्षित यांनी दिली.