डॉ. कैलासावडिवू सिवन यांना लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने या वर्षी लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिकाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांना सन्मानित करण्यात येणार आहे.  एकाच प्रक्षेपकातून एकाचवेळी 104 उपग्रह इस्रोने अवकाशात सोडले. तो विक्रम डॉ. सिवन यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. जागतिक स्तरावर भारतीय  अवकाश संशोधनाची कीर्ती पोहोचवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार  देण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पारितोषिकाची घोषणा केली. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यावेळी उपस्थित होते.

डॉ. सिवन भारतीय अवकाश शास्त्रज्ञ असून, केंद्र शासनाच्या अवकाश संशोधन विभागाचे सचिवही आहेत. भारतीय अवकाश संस्थेमध्ये होत असलेल्या संशोधनामुळे जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावले आहे.  भारताने अवकाशामध्ये एकाच वेळी 104 उपग्रह सोडून जगाला आपली अवकाशातील ताकद दाखवून दिली आहे. उपग्रहांना अंतराळामध्ये कसे स्थिर ठेवले जाईल यासंदर्भातील तांत्रिक बाबींवर त्यांनी संशोधन केले, स्वदेशी अंतराळ यान  विकसित करण्यामध्ये त्यांनी  महत्त्वाची भूमिका  बजावली  आहे.  त्यांच्या या संशोधनाचे मोलाचे कार्य लक्षात घेऊन ट्रस्टच्या विश्वस्तांनी लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिकासाठी त्यांची एकमताने निवड केली, असे डॉ. टिळक यांनी नमूद केले.
[amazon_link asins=’B07BSBZ3T6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a780b818-9197-11e8-8029-e3c6fedc9b2b’]
सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि  एक लाख रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. समाज व राष्ट्रासाठी सेवाभावी वृत्तीने सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीला हे पारितोषिक देऊन गौरविले जाते.

लोकमान्य टिळकांच्या  98 व्या पुण्यतिथी दिनी बुधवार दि. 1 ऑगस्ट 2018 रोजी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सायंकाळी 6.15  वाजता होणाऱ्या  समारंभात डॉ. टिळक यांच्या हस्ते या पारितोषिकाचे वितरण होईल. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही सन्माननीय उपस्थिती राहील.

1983 पासून प्रदान करण्यात येत असलेल्या या पारितोषिकाचे हे 37 वे वर्ष आहे. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी, माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, मॉंटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण तर मागील वर्षी आचार्य बाळकृष्णजी यांना लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

[amazon_link asins=’B077WY86ZT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8271c09-9197-11e8-b599-71dfd8d54a9b’]

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात सिवन यांचा जन्म झाला. तामिळनाडू येथील साराक्कलवाई गावात तमिळ माध्यमाच्या शाळेत त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केेलेे. कन्याकुमारी जिल्ह्यातील वल्लन्नकुमारनलाई येथे त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. ते आपल्या कुटुंबातील पहिले पदवीधर आहेत. यानंतर 1980 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु येथील एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांनी इस्रोमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये पीएचडी मिळवली. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कामास सुरुवात केल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचे संशोधन केले. 1982 मध्ये पोलार उपग्रह वाहन प्रकल्पामध्ये सिवन यांनी काम पाहिले आहे. 2 जुलै 2014 मध्ये इस्रोच्या लिक्विड प्रॉपलसन सिस्टिम सेंटरचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.  इस्रोच्या प्रक्षेपण वाहनासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने पीएसएलव्हीसाठी त्यांनी मिशन डिझाइन प्रक्रिया आणि अभिनव मिशन डिझाइन योजनेचा पाया घातला. 6 डी प्रक्षेपक सिम्युलेशन सॉफ्टवेअरचे ते मुख्य शिल्पकार आहेत. त्यांच्या संशोधनामुळे हवामानाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रक्षेपण करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. सिवन यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये श्री हरिओम आश्रम यांच्याकडून विक्रम साराभाई रिसर्च सन्मान (1999), इस्रो मेरिट पुरस्कार (2007), डॉ. बिरेन रॉय स्पेस सायन्स पुरस्कार (2007) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्यावेळी डॉ. दीपक ज. टिळक यांनी लिहिलेल्या “लीगल बॅटल ऑफ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ हे लोकमान्य टिळकांच्या खटल्याच्या वृत्तांताचे आणि ‘लोकमान्य टिळक आणि प्रसार माध्यमे’ हे वृत्तपत्र, रंगभूमी, कीर्तने, मेळे, व्याख्याने, चित्रकला यांचा टिळकांनी युगप्रवर्तनाकरता कसा उपयोग केला याबाबतच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल.