डाॅ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ कायम,युध्दपातळीवर तपास सुरू

पोलीसनामा ऑनलाइन – महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांनी सोेमवारी दुपारी आनंदवनातील घरी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यांच्या आत्महत्येमागील कारणांचा उलगडा करण्यात पोलिस व्यस्त आहेत. आत्महत्येला २४ तास उलटून गेले तरी डाॅ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे.

सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी घटनास्थ‌ळाचा पंचनामा केला. ठोस पुरावा आढळला नसल्याचे तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. नीलेश पांडे यांनी सांगितले. डाॅ. शीतल यांनी मानसिक तणावातून आयुष्य संपविल्याची चर्चा आनंदवनात आहे. मात्र त्यांना मानसिक तणाव कशाचा होता, ही बाब अद्याप समजलेलं नाही. डाॅ. शीतल यांच्या आनंदवनातील कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेज, लॅपटाॅप, मोबाईल, संगणक यासह औषधी व रिकाम्या सिरींज हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाना पाटेकरांनी केलं सांत्वन
डाॅ. शीतल यांच्या मृत्यूची बातमी समजता अभिनेते नाना पाटेकर यांना धक्का बसला. पाटेकर यांनी आमटे कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांचं सांत्वन केलं.

आमटे कुटुंबीयांचे मौन
अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आमटे कुटुंबीयांकडून आलेली नाही. शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. ‘

आमटे कुटुंबीयांना धक्का

डाॅ. विकास व भारती आमटे यांना शीतल व कौस्तुभ असे दोन अपत्य आहेत. डाॅ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना दिगंत आणि अनिकेत ही दोन मुले आहेत. डाॅ. शीतल ही आमटे कुटुंबीयांतील एकुलती एक लाडकी लेक होती. तिच्या आत्महत्येने आमटे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. संस्थेच्या व्यवस्थापनावरून आमटे कुटुंबात कलह निर्माण झाला होता. त्यातून शीतल एकट्या पडल्या होत्या. त्याच मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आनंदवनात आहे.