विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोरोनामुळे मागील सहा महिन्यापासून विधिमंडळाचे कामकाज झाले नाही. कोरोनाच्या अनेक निर्बंधासह सुरु झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनामध्ये विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपने ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांना उमेदवारी दिली होती.

भाजपचे भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकापचे जयंत पाटील यांनी मंजूरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांकडून नीलम गोऱ्हेंना शुभेच्छा
नीलम गोऱ्हे कायम संकटात मदतीस धावून जाणाऱ्या आहेत. महिला अत्याचार यावर कायम आवाज उठवतात. सभागृह सदस्य म्हणून नीलम गोऱ्हे यांचे काम उत्तम आहे. आधीही उपसभापतीची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. यापुढे चांगले काम करत रहावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.