डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2020 : विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात केंद्र सरकारला रस नाही : खा. वंदना चव्हाण

पुणे – ‘भारतातील इतर पुढारलेल्या धर्मांच्या तुलनेत मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी असून समाजातील वंचित,मागास ,अल्पसंख्य समुदायाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे डॉ पी ए इनामदार यांचे कार्य हे अतुलनीय आहे’,असे उद्गार खासदार वंदना चव्हाण यांनी काढले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२०’ सोमवार २८ डिसेंबर रोजी सकाळी आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या प्रसंगी खा.चव्हाण बोलत होत्या.संस्थेचे सचिव डॉ लतीफ मगदूम अध्यक्ष स्थानी होते.

माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे, बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे संस्थापक हणमंत गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते जे के सराफ, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, घटस्फोट रोखण्यासाठी समुपदेशनाचे काम करणारे अ‍ॅड. समीर शेख यांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.सन्मान सोहळ्याचे हे बारावे वर्ष होते. हणमंत गायकवाड यांच्या वतीने रवी घाटे यांनी सन्मान स्वीकारला.

डॉ पी ए इनामदार यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण यावेळी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,आझम कॅम्पस परिवारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी प्रा.रणजित घोगले,डॉ. जालिस अहमद यांना गौरविण्यात आले. रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले.नूरजहान शेख यांनी आभार मानले. खासदार एड वंदना चव्हाण म्हणाल्या,’राज्यकर्त्यांना,धोरणकर्त्यांना निर्णय घेण्यासाठी साक्षरतेचे प्रमाण हा निकष महत्वाचा असतो.भारतातील साक्षरतेचा अभ्यास केला तर इतर धर्मात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे.त्यामुळे वंचित,मागास आणि अल्पसंख्य समुदायाचे शिक्षण हे महत्वाचे काम असून डॉ पी ए इनामदार यांनी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या समुदायाच्या शिक्षणाचे केलेले कार्य हे अतुलनीय आहे.या कॅम्पस मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला जातो. विद्यार्थिनींची वाढती संख्या पाहून समाधान वाटते. मागे पडलेले समुदाय प्रगतीकडे नेण्यासाठी,देशासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी देशात पोषक वातावरण आणि संसदीय चर्चा आवश्यक असून केंद्र सरकार अधिवेशने रद्द करून ही चर्चाच टाळत आहे. या सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. जर कोणी प्रश्न विचारले तर त्याला देशद्रोही ठरवले जाते’,असेही त्या म्हणाल्या.

माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले,’सद्य परिस्थितीत बोलत राहणे आणि प्रश्न विचारात राहणे आवश्यक आहे.चेहरे बदलण्यापेक्षा व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणपद्धती कालबाह्य झाली असून तिला पर्याय देणे हे आव्हानात्मक काम असून ‘कुडाची शाळा’ या प्रकल्पातून आम्ही पर्याय देण्याचे काम करीत आहोत’.

नंदिनी जाधव म्हणाल्या,’अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही करावे लागत आहे. शहरी भागातही बुवाबाजी,जात पंचायत आणि कौमार्य चाचणी सारख्या गोष्टी घडत आहे,हे अतिशय चिंताजनक आहे.
*पुरस्कारार्थी*

१. सुरेश खोपडे (निवृत्त आय पी एस अधिकारी )-लोकशाही अधिकारांसाठी संघर्ष करण्याबद्दल —

२. हनमंत गायकवाड –बी व्ही जी इंडिया लिमिटेड -१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे कोविड काळात राज्यात वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल …..

३. नंदिनी जाधव (अंधश्रद्धा निर्मुलन समिती -१८८ महिलांच्या जटानिर्मुलनाबद्दल )….

४. जे के सराफ –प्लास्टिक असोसिएशन ,मराठा चेंबर,आणि ४ ट्रस्ट च्या माध्यामतून सामाजिक कार्य …….

५. एड समीर शेख –१००० घटस्फोट समुपदेशनातून रोखल्याबद्दल ….