डॉ. पायल तडवी प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पायलच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे तसेच डॉ पायल यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांनी पायलच्या दोषींना त्वरीत शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील पायलला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती मिळते आहे.

काय आहे प्रकरण ?

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात डॉ. पायल शिक्षण घेत होत्या. तेव्हा त्यांच्यासह काम करणाऱ्या वरिष्ठ सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींकडून डॉ पायल यांना मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. या त्रासाला कंटाळून पायल यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या तिनही महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

सुसाईड नोट नष्ट केल्याचा संशय

डॉ. पायल तडवीचे रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील तीन महिला डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलीस रिमांडवर पाठवले. आत्महत्येपूर्वी डॉ. पायलने एखादी सुसाईट नोट लिहून ठेवली असावी तसेच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असलेली ही सुसाईड नोट या तिघा डॉक्टरांनीच नष्ट केली असावी असा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास करता यावा म्हणून या डॉक्टरांना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली, परंतु सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांनी या तिघांना तूर्त तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Loading...
You might also like