पायल तडवी आत्महत्या प्रकरणी रामदास आठवले म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. पायल ताडवीच्या कुटुंबियांना न्याय मिळवा आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी बोलताना आठवले म्हणाले , “नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांची झालेली आत्महत्या हे गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणी कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदवून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी आणि डॉ. पायल यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे” असे आठवले यांनी सांगितले आहे.

पुरोगामी महाराष्‍ट्राला काळिमा फासणारी घटना

तसेच यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ” दिवंगत डॉ. पायल तडवी या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील असून गेल्या वर्षीच नायर रुग्णालयात त्यांनी प्रवेश मिळविला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे दिलेल्या आरक्षणामुळे उच्चशिक्षित झाल्या.मात्र गुणवत्तेमुळेच त्या डॉक्टर झाल्या आहेत. अनुसुचित जाती जमातीच्या दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना जातीवरून छळवणूकीचे आजही निंदनीय प्रकार घडतात; रॅगिंग केले जाते. डॉ. पायल तडवी ही जातिद्वेषाची बळी ठरली ही पुरोगामी महाराष्‍ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. “असे सांगत या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फे रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे.

काय आहे प्रकरण ?

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात डॉ. पायल शिक्षण घेत होत्या. तेव्हा त्यांच्यासह काम करणाऱ्या वरिष्ठ सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींकडून डॉ पायल यांना मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. या त्रासाला कंटाळून पायल यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या तिनही महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.