डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण ; पुण्यात विविध संघटनांनी व्यक्त केला निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटलच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवीने सहकारी डॉक्टरांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले. या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही या प्रकरणाचा विविध पुरोगामी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातील गुडलक चौकात एकत्र येऊन विविध संघटनांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. या संघटनांमध्ये वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, श्रमिक महिला मोर्चा या संघटनांचा प्रामुख्याने समावेश होता.

मनुवाद मुर्दाबाद, जातीयवाद मुर्दाबाद, संविधान झिंदाबाद, जातीवाद हो बर्बाद अशा घोषणा देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेधाबरोबरच संघटनांनी विविध मागण्याही केल्या आहेत. त्या मध्ये डॉ. पायलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिन्ही डॉक्टरांना त्वरित अटक करा. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून त्या तीन गुन्हेगार डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे. डॉ. पायल यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येणाऱ्या विभाग प्रमुखांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सदरचा खटला ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत विशेष कोर्टात जलद गतीने चालवण्यात यावा या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. नायर हॉस्पिटल प्रशासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. शिक्षण संस्थांमध्ये दलित व आदिवासींबरोबर होत असणाऱ्या भेदभाव, जातीय रॅगिंग इत्यादींचा प्रतिबंध करण्यासाठी रोहित वेमुला कायदा त्वरित मंजूर करावा ही मागणी देखील या ठिकाणी मांडण्यात आली.

काय आहे डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण ?
डॉ. पायल तडवी ही आदिवासी समाजातील मुलगी असून मुंबईतील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटलमध्ये एमडीचे शिक्षण घेत होती. त्याच हॉस्पिटलमधील तीन वरिष्ठ डॉक्टारांकडून तिचा मानसिक छळ करण्यात आला. तिला जातीवरून टोमणे मारण्यात आले. तिने कॉलेजच्या प्रशासनाकडे याबद्दल तक्रार करूनही तिची दाखल घेण्यात आली नाही. अखेर तिने या छळाला कंटाळून कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये २२ मेला आत्महत्या केली. तिच्या व्हाट्स अ‍ॅपवरील चॅटिंग वरून तीन वरिष्ठ डॉक्टरांकडून तिचा छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात तसेच देशात देखील उमटत आहे.

#justice_for_payal_tadvi हि हॅशटॅग मोहीम सोशल मीडियावर राबविण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाने देखील नायर हॉस्पिटलला नोटीस पाठवली आहे. पायलच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या तीन्ही डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या तिघींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकराणातील एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.