मुस्लीम समाज राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली लढणार : प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – आतापर्यंत धार्मिक झेंड्याखाली आपल्या मागण्या मुस्लीम समाज मागत होता. परंतु या मोर्चामुळे हा समाज राजकीय झेंड्याखाली मागणी मागण्यासाठी पुढे आला आहे. हा महत्त्वपूर्ण बदल अकोला जिल्ह्यात घडला आहे. यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मुस्लीम समाज आपल्या मागण्यांसाठी राजकीय झेंड्याखाली आरक्षणाच्या मागणीसाठी उभा राहील, असा विश्वास भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

मुस्लीम समाजाला ५ टक्के मिळालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी अकोल्यात एमआयएम वंचित बहुजन आघाडीतर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अकोला क्रिकेट क्लब येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करताना आंबेडकर म्हणाले, सन २०१२-१३ साली मुस्लिमांना ५ आरक्षण मंजूर झाले होते. त्यामुळे मंजूर झालेला आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून हा महामोर्चा काढण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनापर्यंत आमची मागणी पोहोचावी, असा आमचा उद्देश होता.

मोर्चात अ. सादिक इनामदार (अध्यक्ष ता. आकोट),  अशोक सोनावणे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारिप ब.म.स.), युसूफभाई पुजांशी (महाराष्ट्र प्रदेश महासचिव भारिप ब.म.स.), इरफानअली मिरसाहेब (माजी सरपंच. सिरसोली), प्रदिपराव वानखडे (जिल्हाध्यक्ष भारिप ब.म.स. अकोला), डॉ. रहेमान खान, मो. मुस्तफा, मो. युसूफ, सै. मोहसिन सै. अख्तर, अन्सार खा अताउल्ला खा, जमीउल्ला रवाँ पठाण (उपाध्यक्ष जि.प. अकोला) इत्यादी उपस्थित होते.