लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नाट्यलेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर, सुनील शानभाग, लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, तबला वादक योगेश तामसी यांसह देशभरातील 42 कलाकारांना 2017 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. संध्या पुरेचा यांना मानाची संगीत नाटक अकादमी फेलोशिप प्रदान केली. राष्ट्रपती दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी तर्फे दरवर्षी कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. एक लाख रुपये रोख, ताम्रप्रत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भडकमकर गेली दोन दशके नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सुनील शानभाग यांनी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या सोबत त्यांनी 1974 ते 1984 अशा सलग दहा वर्षे 25 कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. पंडित योगेश सामसी यांनी पं.एच. तारथनराव यांच्याकडून वयाच्या चौथ्या वर्षांपासून तबला वादनाचे धडे घेतले.

यानंतर सामसी यांना सलग दोन दशक प्रसिद्ध तबला वादक उस्ताद अल्लारखाँ खान यांचे मार्गदर्शन लाभले. लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख असलेले डॉ. खांडगे 1978 पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. या वेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा कार्यक्रमास उपस्थित हेाते.