भारतात लसीकरणाच्या शुभारंभासोबतच लोकांना मिळाली आणखी एक ‘चांगली’ बातमी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात लसीकरणाला झालेल्या सुरुवातीसोबतच लोकांना आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. कोरोना लस बनविणारी आणखी एक कंपनी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला स्पुटनिक-व्ही (sputnik v) च्या फेज-3 चाचणीची परवानगी मिळाली आहे. स्पुटनिक-व्ही (sputnik v) ही एक रशियन कंपनीने विकसित केलेली कोरोना लस आहे. ही लस अद्याप प्रयोगात्मक अवस्थेत आहे.

डीसीजीआयने डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला कोरोना लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज यांचे म्हणणे आहे की तिसऱ्या टप्प्यात 1500 लोकांवर या लसीची प्रथम तपासणी केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते जगातील 200 हून अधिक कंपन्या कोरोना लस तयार करत आहेत, त्यापैकी 30 कंपन्या भारतातील आहेत.

भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी या दोन्ही लसींचा वापर पहिल्या टप्प्यातील लसीकरणात करण्यात आला. याशिवाय गुजरातची जायकोविड लसही चाचणीच्या अवस्थेत आहे. या शृंखलेत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे देखील सामील झाले आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी मान्यता देण्यात येण्यापूर्वी डेटा आणि सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाने (डीएसएमबी) या लसीच्या दुसर्‍या टप्प्याच्या चाचणीशी संबंधित डेटाचा अभ्यास केला आणि त्यावर पुष्टी केल्यानंतरच तिसऱ्या फेजसाठी स्वयंसेवक भरतीसाठी शिफारस केली.