डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध सुरु, करजगी कुटुंबाच्या जबाबासंदर्भात गोपनीयता

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी डॉ. बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या CEO डाॅ. शीतल आमटे – करजगी यांचा मृत्यू झाल्यापासून पोलिसांनी तपासाची सुत्रे हाती घेतली आहेत. पण नेमका कशाने मृत्यू झाला हे शोधण्यातच पोलिसांचा वेळ जात आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. यासाठी पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पाहावी लागत आहे. हा अहवाल केव्हा प्राप्त होईल, याबाबत पोलीस दखील अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अहवाल येईपर्यंत पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मृत्यूमागील नेमक्या कारणांचाही शोध घेणे सुरू केले आहे.

डाॅ. शीतल या मानसिक तणावात होत्या, तर त्या मानसिक तणावाचे काय कारण होते, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आनंदनातील काही जणांचे जबाब नोंदविले आहेत. मृत्यूला कौटुंबिक कलह कारणीभूत आहे का, या दिशेनेही शोध सुरू आहे. घटनेच्या दिवशी पती गौतम करजगी हे घरी आले तेव्हा त्यांनी डाॅ. शीतल यांना आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दाराची कडी आतून लावलेली होती. गौतम यांनी दार उघडल्यावर डाॅ. शीतल खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना आनंदवनमधील रुग्णवाहिकेतून थेट उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनाक्रमाबाबत पोलिसांनी करजगी कुटुंबीयांचे जबाब नोंदविलेले आहेत. मात्र पोलिसांनी ते गोपनीय ठेवले आहेत.

गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस
पाेलीस सूत्रानुसार, डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे थेट कौटुंबिक कलहाचे कारण जोडता येत नाही. त्यांच्या मृत्यूच्या आठ-दहा दिवसांपूर्वीपर्यंत आमटे कुटुंबीय डाॅ. शीतल यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे आधी मृत्यूच्या कारणांचा उलगडा केला जाईल, त्यानंतर घटनाक्रम शोधला जाईल. गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.