डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेलं औषध हस्तगत, इंजेक्शन आणि गोळ्या देखील आढळल्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. एवढेच नाही तर डॉ. शीतल यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली औषधे, न वापरलेले इंजेक्शन व गोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. जप्त केलेले औषध व डाॅ. शीतल यांच्या विसेरातील नमुने जुळतात वा नाही हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठविले आहे. दरम्यान, डाॅ. शीतल यांची आत्महत्याच असावी, या निष्कर्षापर्यंत तपास पोहाेचला आहे. मात्र, आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि काही महत्त्वाच्या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर पोलीस डाॅ. शीतल मृत्यूबाबत खुलासा करतील, असे सूत्रांनी सांगितले.

डॉ. शीतल यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. बुधवारी त्यांच्या मृत्यूदरम्यान संपर्कात आलेले पती गौतम करजगी, सासू सुहासिनी करजगी व सासरे शिरीष करजगी यांच्यासह दोन नोकरांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. यातून पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना डाॅ. शीतल यांच्या खोलीत एक औषध आढळले. या २० ते २५ गोळ्या गुंगीच्या असण्याची शक्यताही पोलीस सूत्राने वर्तविली आहे. हे औषध डाॅ. शीतल यांच्या विसेराच्या नमुन्याशी जुळते का, किती मात्रा शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, किती वेळात मृत्यू होतो. याचाही शोध पोलीस घेत आहे.

दरम्यान, डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली असेल तर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असती. परंतु आतापर्यंतच्या तपासात ती कुठेही आढळली नाही. जप्त केलेल्या मोबाईल, टॅब वा लॅपटाॅपमध्ये सुसाईड नोट असण्याची दाट शक्यता आहे. यातूनच उलगडा होईल.

आमटे परिवाराचे खूप मोठे नुकसान
जे घडले ते फार दुर्दैवी आहे. शीतल अतिशय बुद्धिमान व गुणवत्तादायी होती. तिने जे काही स्वप्न पाहिले. तिची पुढील दिशा जी काही होती. ते पूर्ण करण्यासाठी आमटे कुटुंबीय कटिबद्ध आहेत. डाॅ. शीतलच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर सत्य पुढे येईलच. डाॅ. शीतलच्या मृत्यूने आमटे परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरायला वेळ लागेल. आजवर समाजाने आनंदवनला जे सहकार्य केले. तसेच सहकार्य यापुढेही मिळतील, असे पल्लवी आमटे यांनी म्हटले.

तपास योग्य दिशेने
डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबतचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आत्महत्या असावी, असे एकूणच तपासावरून दिसून येत आहे. परंतु फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ते स्पष्ट होईल, असे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.