समाजाप्रती बांधिलकी जपणारे डॉ. शंतनू जगदाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजाप्रती बांधिलकी जपत समाजसेवेचे व्रत हाती घेऊन काम करणारा डॉक्टर म्हणजे देवदूतच हे मान्यच केले पाहिजे. श्रद्धा जरूर असली पाहिजे मात्र अंधश्रद्धा नको. विज्ञानाचे अनुकरण करत नवे तंत्रज्ञान, उपचारपद्धती करत समाजामधील महत्त्वाचा आणि तितकाच जबाबदार घटक हा डॉक्टर आहे. अगदी रात्री-अपरात्रीसुद्धा सामान्य नागरिक स्वत:सह कुटुंबावर उपचारासाठी डॉक्टरांच्या क्लीनिक, हॉस्पिटल आणि घराचे दरवाजे हक्काने ठोठावतो. डॉक्टरही त्यांच्या हाकेला धावून जात उपचार करतात.

हडपसर (गोंधळेनगर, मूळ. मूर्टी, ता. बारामती) असाच एक अवलिया डॉ. शंतनू जगदाळे हा एक आहे. डॉ. जगदाळे यांच्या कुटुंबीयांशी तसे माझे जुने जिव्हाळ्याचे संबंध. आई – वडिल दोघेही साधना विद्यालयातील आदर्श शिक्षक अशीच त्यांची पालक – मुलांप्रती ओळख आहे. मुलगा डॉक्टर आहे, हे सांगण्यासाठीसुद्धा त्यांनी मला बराच वर्षांचा कालावधी लावला. अखेर डॉक्टर असल्याचे समजले, तेव्हापासून ते आमच्या कटुंबातील एक घटकच बनले आहेत.

कोरोनाच्या कालावधीमध्ये रात्री अपरात्री उपचारासाठी धावपळ, उपचार करण्यात सतत व्यस्त असणारे व्यक्तीमत्त्व आहे. गोंधळेनगर आणि मंतरवाडी येथे त्यांचे क्लीनिक आहे. त्यांच्या अर्धांगिनीही या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. अलीकडे घरपोच रुग्णसेवा देणारे डॉक्टर काही विरळाच आहेत. डॉक्टरांना रात्री अपरात्री फोन केला, आता क्लीनिक बंद केले आहे, उद्या सकाळी तात्पुरती क्रोसिन घ्या किंवा त्रास होत असेल तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट (दाखल) व्हा असा सल्ला देणारी मंडळी आहेत. मात्र, त्याला डॉ. जगदाळे अपवाद आहेत. सातववाडी, गोंधळेनगर, मंतरवाडी परिसरातील बहुतेक सामान्य व्यक्ती डॉक्टरांच्या ओळखीच्या झाल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक उपचारासाठी त्यांच्याकडे हक्काने धाव घेतात, नव्हे, डॉक्टरसुद्धा तेवढ्याच आपुलकीने उपचार करीत आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.