स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेऊन डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या !

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व वरोरा आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे (Dr. Sheetal Amte) यांनी सोमवारी (दि. 30) आत्महत्या केली आहे. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणा-या आनंदवनातच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक क्षेत्र हादरले आहे.

डॉ. शीतल यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात, तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या.

शीतल करजगी -आमटे यांच्या वक्तव्यावर आमटे कुटुंबीयांनी दिले होते निवेदन

लोकाश्रयावर विकसित झालेल्या महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेबद्दल आमटे कुटुंबातील शीतल गौतम करजगी-आमटे यांनी अनुचित वक्तव्य असल्याबाबत बोलताना, आमटे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी, एका निवेदनाद्वारे, समितीच्या कामाबद्दल कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये अशी भावना अलीकडेच व्यक्त केली होती. 25 नोव्हेंबर रोजी त्याबाबतचे निवेदन एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते.

डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी संयुक्तपणे काढलेल्या या निवेदनात, डॉ. शीतल करजगी यांनी संस्थेच्या कार्यात योगदान दिले आहे. परंतु त्या सध्या मानसिक ताण आणि नैराश्येचा सामना करीत आहेत. समाजमाध्यमांवर अलीकडेच त्यांनी तशी स्पष्ट कबुलीही दिली होती. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमटे कुटुंबीयांनी केले होते. आमच्या नैतिक भूमिकांशी, ध्येय उद्दिष्टांशी आजन्म प्रामाणिक राहू, आमच्या प्रत्येक प्रकल्पात नैतिक कायदेशीर मूल्ये आणि पारदर्शकता जपली जाईल, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले होते.