डॉ. शीतल आमटे यांनी का उचलले टोकाचे पाऊल ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान, डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

डॉ. शीतल आमटे यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वरोरा येथे झालं. ११ ते १२ वी चे शिक्षण आनंद निकेतन महाविद्यालयातून पूर्ण केलं. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. कर्मयोगी बाबा आमटे यांचा वारसा तिसऱ्या पिढीच्या रूपाने त्या चालवीत होत्या. पुणे येथील करजगी परिवारातील गौतम करजगी यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना सहा वर्षाचा शर्विल नावाचा मुलगा आहे. २०१७ पासून डॉक्टर शीतल महारोगी सेवा समितीच्या आनंदवनच्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती गौतम करजगी आनंदवनात अंतर्गत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आनंदवनात मुख्य व्यवसाय शेती आहे. या सोबतच दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, हातमाग, सतरंज्या तयार करणे,कपाट तयार करणे, तीन चाकी सायकल तयार करणे या वर्कशॉपमध्ये साहित्य तयार केले जातात. या सर्व बाबींवर डॉ. शीतल कार्य करीत होत्या. आनंदवनातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, निराधार व्यक्ती मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.

डॉ. शीतल आमटे- करजगी काही महिन्यांपासून निराशेत असल्याचं समजतं. त्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेतली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आनंदवनातील अस्थिर वातावरण सोशल मीडियावर पुढे येत होतं. डॉ. शीतल यांनी सोशल मीडियावर महारोगी सेवा समिती आरोप केले होत. त्याचे आमटे कुटुंब यांनी संयुक्त निवेदन करून खंडन केले. डॉ. शीतल यांना मानसिक ताण असून त्या निराशेत असल्याचं नमूद केलं होतं. या घडामोडीतून डॉ. शीतल एकांगी पडल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. शीतल यांच्या आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ व त्यांच्या पत्नी ही मंडळी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर त्यांचे वडील डॉ. विकास आमटे हे आनंदवनात वास्तव्यास नव्हते. ही सर्व मंडळी हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे राहात आहेत. दरम्यान, कर्मयोगी बाबा व साधनाताईंच्या समाजसेवेचा वसा पुढे नेत असताना वेळोवेळी बाबा व साधनाताईच्या स्मृतींना उजळा देत होत्या. आनंदवनातील श्रद्धावनात कर्मयोगी बाबा साधनाताई समाधीजवळ डॉक्टर शीतल आमटे अंतिम विसावा घेणार आहेत.

डॉ. शीतल आमटे करजगी – कोरोना योद्धा

यांनी प्रशासनाने कोरोना विषाणू विरोधात लढण्याकरिता समाजातील घटकांना कोरोना योद्धा म्हणून सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉ. शीतल आमटे यांनी सामील होऊन कार्य केले. या कार्याबाबत १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती वरोरा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला होता.