खळबळजनक ! डाॅ. शीतल आमटे यांनी यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांच्या मृत्यूचे गुढ कायम असताना त्यांनी जून 2020 मध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर डाॅ. शीतल आमटे काही वर्षांपासून मानसिक तणावात होत्या. त्या मृत्यूच्या 6 महिन्यांपूर्वीपासून नागपूरच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याची बाबही निष्पन्न झाली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बुधवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली.

डाॅ. शीतल यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे 21 नोव्हेंबर 2020 रोजी प्राणघातक लेथल इंजेक्शन विषयी विचारणा केली होती. वास्तविक, आनंदवनातील रुग्णालयात अशा प्रकारचे इंजेक्शन सामान्यत: वापरले जात नाही, याकडेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी लक्ष वेधले आहे. घटनास्थळावरून एका इंजेक्शनचे ॲम्पोल फुटलेल्या स्थितीत आढळून आले आहे. तसेच वापरलेली सिरींजही मिळून आली होती. मात्र सुसाईड नोट आढळली नाही, ही बाबही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केली. शवविच्छेदन अहवालानुसार डाॅ. शीतल यांचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाल्याचेही पोलीस स्पष्ट केले. परंतु त्यांच्या उजव्या हातावर इंटरावेनस इंजेक्शनचे व्रण होते. तपासात घातपात झाल्याबाबतचा कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळून आला नसल्याचेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत 26 साक्षदारांचे बयाण नोंदविले असल्याचे ते म्हणाले.

त्या अहवालानंतरच प्रकरणाचे गुढ उकलणार
घटनास्थ‌ळावरून जप्त मुद्देमाल, व्हिसेरा रासायनिक परीक्षणासाठी चंद्रपूर व नागपूर येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवलेला आहे. जप्त 3 मोबाईल, 1 लॅपटाॅप, 1 टॅबलेटही परीक्षणासाठी मुंबई येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले असून एकही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवालानंतरच या प्रकरणाचे गुढ उकलणार आहे.