डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात 2 पुरावे पोलिसांना मिळाले

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात अजूनही पोलिसांना यश आले नाही. पोलिसांनी विविध शक्यता वर्तवत त्याअनुषंगाने तपास सुरू केला आहे. दरम्यान, तपासाअंती एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. डॉ. शीतल यांनी नागपूर येथील एका औषध विक्रेत्याकडून कुत्र्याला मारण्याची पाच इंजेक्शन मागविली होती. त्याचा पुरवठादेखील आनंदवन येथील रुग्णालयाला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दिशेनेदेखील तपासाची चक्रे फिरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या. परंतु, मृत्यूच्या दिवशी त्या बाहेरच पडल्या नव्हत्या. याबाबतही तपास सुरू आहे.

शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल आमटे यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली आहे. त्यातच आता मृत्युपूर्वी त्यांनी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून नागपूर येथून पाच इंजेक्शन मागितल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात आहे. मात्र, त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरिंज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाइल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे.

पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले
डाॅ. शीतल यांच्या मृत्युप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळले आहेत. ते सर्व बाजूंनी जुळतात की नाही याचा तपास सुरू आहे. डाॅ. शीतल आमटे यांच्या उजव्या हाताला इंजेक्शनची टोचल्याची खूण आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू विषारी इंजेक्शन टोचल्याने झाल्याचा संशय पोलीस वर्तवत आहेत. डाॅ. शीतल आमटे या डावखुऱ्या नव्हत्या. मग त्यांनी उजव्या हाताला इंजेक्शन कसे घेतले? ही बाब पोलिसांना विचार करायला लावणारी असल्याचे समजते. यामागे अन्य कारण तर नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.