नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाकडून डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु !

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांची नात व आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 30) दुपारी घडली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. वरोरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. दरम्यान नागपूरहून फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले असून ते घटनस्थळी तपासणी करत असल्याची माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे.

नागपूरची फॉरेन्सिक टीम सध्या तपास करीत आहे. डॉ. शीतल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात असून रुग्णालयाकडून तासाभरात शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे हे स्पष्ट होईल. अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याचे चंद्रपूरचे पोलीस उपाधीक्षक निलेश पांडे यांनी सांगितले. झोपेच्या गोळ्या घेऊन की विषारी इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे का ? याबाबत आता निष्कर्ष काढू शकत नाही. ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. तसेच मृतदेह आनंदवन येथील त्यांच्या रहात्या घरी बेडरूममध्ये आढळून आला. फॉरेन्सिकची टीम त्यांच्या घरात काही तांत्रिक पुरावे मिळतात का हे पाहत आहेत, असे पुढे पांडे यांनी सांगितले.

मात्र, डॉ. शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शीतल आमटे- करजगी या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर आहेत. शीतल या 39 वर्षांच्या होत्या. त्यांना शर्विल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे.